Uncategorized

शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष

www.mjnewssatara.live

शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई.दि.१५. गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर असलेले जयंत पाटील यांनी अखेर राजीनामा दिला असून नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून साताऱ्याच्या शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा पक्षाकडून अधिकृतरित्या करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण बैठकीत जयंत पाटील यांनी निरोपाचे भाषण केले. त्यानंतर पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान शशिकांत शिंदे यांच्यासमोर असेल.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षात फेरबदल व्हावेत, अध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्या नेत्याकडे द्यावीत, अशी पक्षांतर्गत मागणी होऊ लागली. मात्र लोकसभा निवडणुका जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच लढल्या जातील, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. पाच वर्षे बांधलेले संघटन, बिनचूक उमेदवारांची निवड आणि सरकारविरोधी जनमताचा फायदा राष्ट्रवादीला होऊन लोकसभा निवडणुकीत जयंतरावांच्या नेतृत्वात १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आले. विधानसभेलाही हीच रणनीती कायम ठेवून जयंत पाटील यांनी राज्य पिंजून काढले. परंतु यावेळी महायुतीने मविआला जोरदार धोबीपछाड दिल्याने जयंतरावांना पक्षाची सदस्यसंख्या विशीपारही घेऊन जाण्यात अपयश आले. तेव्हापासून जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीजोर धरू लागली. जुलै २०१८ ते जुलै २०२५ अशी सात वर्षे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले.

शशिकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्रातील नेते. माथाडी कामगार संघटनांमध्ये त्यांचे वजन आहे, त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणातही त्यांचा वावर असतो. कोरेगाव विधानसभेचे दोन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले. शशिकांत शिंदे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला पुन्हा मराठा प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. लढाऊ, झुंजार आणि आक्रमक शैलीत विरोधकांवर तुटून पडणारे अशी त्यांची ओळख आहे. शशिकांत शिंदे यांचे शरद पवार यांच्याशी अतिशय निकटचे संबंध आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यासमोरील पहिली चाचणी असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्ष संघटना दुभंगली आहे. स्थानिक पातळीवर पक्षाचे म्हणावे असे संघटन नाही. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यात गावोगावी जाऊन पक्षाचा विचार जनमाणसांत पेरण्याचे पहिले काम शशिकांत शिंदे यांना करावे लागणार आहे. तसेच राज्यात विभागवार आढावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांची गणिते शिंदे यांना जुळवावी लागतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button