कास पठारावरील पेटेश्वरनगर येथे रोजगार, स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन…

कास पठारावरील पेटेश्वरनगर येथे रोजगार, स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन….
कास पठार.दि.30. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठार परिसरात स्थानिक तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी कास पठार भूमिपुत्र संघटना, प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठान कास पठार विभाग सातारा मुंबई, युवा फाउंडेशन कास पठार विभाग सातारा, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सातारा मुंबई व डोंगरी भाग स्थानिक हॉटेल ओनर्स असोसिएशन या सर्वांच्या पुढाकाराने 5 मे रोजी आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर (पेट्री) या ठिकाणी होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कास पठार जागतिक वारसा स्थळ असले तरी कास परिसरातील आजूबाजूच्या गावातील अनेक तरुण रोजगारासाठी पुणे, मुंबई अशा शहरात जावे लागते. त्या ठिकाणी असणारा तुटपुंजा पगार आणि महागाई यांचा ताळमेळ घालता शहराकडील तरुण मेटाकोटीला येत आहे.पुरतही नाही आणि उरतही नाही मुलांची शाळेची फी गावाकडे असणारे आई वडील यांचा खर्च हे पूर्ण करताना हे तरुण हवालदिल झाले आहेत यातूनच कास पठार परिसरात स्थानिक उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी यांचा शोध घेऊन तरुणांना काय करता येईल या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे. कास पठार परिसरात साधारणपणे पन्नास ते ऐंशीच्या दरम्यान हॉटेल्स, रिसॉर्ट असून साधारणपणे 300 ते 400 कामगार काम करत आहेत. यामध्ये काही स्थानिक महिला सोडता उर्वरित सत्तर टक्के कामगार बाहेरील आहेत. महिलांनाही या परिसरात रोजगाराची संधी असून त्यांना चांगला मेहताना मिळत आहे. त्यानंतर आचारी, मॅनेजर अशा लोकांना सरासरी 20 ते 25 हजार पगार तसेच वेटर हेल्पर यांनाही 10 हजार च्या वर पगार मिळतो. बाहेरील लोक काम करत रोजगार मिळवत असताना स्थानिक मात्र बाहेर जात आहेत. हेच लक्षात घेऊन या मेळाव्यातून तरुणांना आवश्यक ती कौशल्य आत्मसात करून स्थानिक पातळीवर रोजगार कसा मिळवता येईल याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या मेळाव्याला जास्तीत जास्त तरूणांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रतिक्रिया – कास परिसरात प्लंबर, लाईट फिटर, वेल्डर असे आवश्यक स्थानिक कारागीर मिळेनासे झाले आहेत. स्थानिक तरुणांना याबाबत मार्गदर्शन करून या ठिकाणी रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या उपलब्ध संधी व काम याबाबत या मेळाव्यातून जागृत करण्यात येईल.
सोमनाथ जाधव. माजी अध्यक्ष कास समिती.