
साताऱ्याची सम्राज्ञी ठरली जावलीतील स्नेहल जुनघरे!
एम.जे.न्युज.सातारा.
सातारा.दि.22.जावली तालुक्यातील दिवदेववाडी गावच्या स्नेहल प्रशांत जुनघरे यांनी सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा उत्कृष्ट संगम साधत हिरकणी महोत्सव सातारा आयोजित ‘मिसेस सम्राज्ञी सातारा’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला आहे.
स्नेहल यांचा प्रवास एका सर्वसामान्य कुटुंबातून सुरू झाला. शिक्षणात त्यांनी BE इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण केल्यानंतर महिंद्रा या नामांकित कंपनीत चार वर्षे सेवा दिली असून सध्या त्या TATA या आंतरराष्ट्रीय IT कंपनीत कार्यरत आहेत.
या स्पर्धेत सहभागी होत त्यांनी शेकडो स्पर्धकांमध्ये आपल्या आत्मविश्वास, सादरीकरण आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि साताऱ्याच्या सम्राज्ञीचा मान पटकावला. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना रजनीश दुग्गल (प्रसिद्ध चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याची आणखी एक खासियत म्हणजे यासाठी स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव आणि किरण माने या मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांनी उपस्थिती लावून सोहळ्याला चार चाँद लावले.
या भव्य कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन जयश्री पार्टे शेलार व त्यांच्या हिरकणी फाउंडेशन टीमने केले होते.
स्नेहल जुनघरे म्हणाल्या:
“सामान्य कुटुंबातून असूनही मला मिळालेला हा सन्मान संपूर्ण जावली तालुक्याची मान उंचावणारा आहे. हिरकणी महोत्सवाच्या या व्यासपीठावर सहभागी होणं ही केवळ एक संधी नव्हे, तर माझ्यासाठी सन्मानाची पर्वणी ठरली आहे. ‘साताऱ्याची सम्राज्ञी’ हा किताब मिळाल्याचा मला अत्यंत आनंद आहे.”
संपूर्ण जावली तालुक्याच्या वतीने स्नेहल प्रशांत जुनघरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!