जावलीकरांसाठी मी कधीच मंत्रीपदाचा आव आणणार नाही. — शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिवेंद्रसिंहराजेंचा नागरी सत्कार सोहळा मेढ्यात प्रचंड गर्दीत संपन्न.

जावलीकरांसाठी मी कधीच मंत्रीपदाचा आव आणणार नाही. — शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिवेंद्रसिंहराजेंचा नागरी सत्कार सोहळा मेढ्यात प्रचंड गर्दीत संपन्न.
जावली,मेढा,दि.30: मी मंत्री असलो तरी महाराष्ट्र राज्याचा आहे. जावलीकरांसाठी तसेच माझ्या मतदारसंघासाठी सदैव मी बाबाच असणार आहे. तसेच जावलीकरांसाठी मी कधीच मंत्रीपदाचा आव आणणार नाही असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल जावली तालुका भाजपाच्या वतीने त्यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन मेढा ता.जावली येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमासाठी राजेंद्र राजपुरे,दत्ता गावडे, गटविकास अधिकारी निलेश पाटील, बापूराव पार्टे, तहसीलदार हणमंत कोळेकर, विकास देशपांडे, दत्ताअण्णा पवार, अर्चनाताई रांजणे निर्मला दुधाने, रुपाली वारागडे, यांच्यासह भाजपा कार्यकर्ते तसेच महायुतीचे पदाधिकारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले सातारा व जावली तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सदैव काम करत आलोय. त्यामुळे मला प्रत्येकाच्या मनात, ह्रदयात घर करता आले. जावली तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर,मुऱ्यादऱ्यांवर सर्वत्र रस्त्यांची कामे मार्गे लागली आहेत. आता शेतीसाठी पाण्याची मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत. यासाठी बोंडारवाडी धरण लवकरात लवकर व्हावे यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. तसेच पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. महू हातगेघर धरणाचा कॅनॉलचे काम सुद्धा सुरू झाले आहे. त्यामुळे या धरणाचे पाणी सुद्धा लवकरच शिवारात येईल. तसेच मेढा शहर दिवसेंदिवस वाढत चालले असून मेढ्याच्या परिपूर्ण विकासासाठी सुद्धा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला प्रथमच चार मंत्रीपदे मिळाली आहेत त्यामुळे त्याचा फायदा घेत जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान या कार्यक्रमात आपल्या मनोगतादरम्यान मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील म्हणाले महाराष्ट्र राज्याचे आदर्श मंत्री म्हणून शिवेंद्रसिंहराजेंची गणना होईल. बाबराजेंची गरुडासारखी नजर आपल्या मतदार संघावर असल्यामुळे तसेच बाबांनी शांत व संयमीपणे मतदार संघाचे नेतृत्व केल्यामुळे मतदार संघाचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून होत आहे. शिवेंद्रसिंहराजेंचे वडील अभयसिंहराजे यांच्यामुळे उरमोडी धरण झाले असून त्यांच्या दुष्काळाचा कलंक मिटला आहे. तसेच महायुतीमुळे जिल्ह्याला चार मंत्रीपदे मिळाली असून यातून जिल्ह्याचा चांगला विकास होईल असे मत सुद्धा मंत्री मकरंद पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, शिक्षक नेते मच्छिंद्र मुळीक,माजी सभापती सुहास गिरी, अरुणा शिर्के, मेढ्याचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे,वसंतराव मानकुमरे, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांनी आपली मनोगते व्यक्त करत मंत्री भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयदीप शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ शिंदे, सागर धनावडे, यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले. या नागरी सत्कार सोहळ्यासाठी तसेच शिवेंद्रसिंहराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जावली तालुक्यातुन विविध गावचे सरपंच, विविध संस्थाचे पदाधिकारी तसेच हजारो नागरिक उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमासाठी मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी आपल्या फौजफाट्यासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
चौकट:
सातारा व जावली तालुक्यातील स्मशानभूमीच्या रस्त्यांचा प्रश्न खूप मोठा व महत्वाचा आहे. यासाठी गावांनी मागणी केली किंवा नाही केली तरी ते रस्ते व्हावेत यासाठी मी स्वतः लक्ष घालून काम करणार असून याचा ६५ ते ७० कोटी रुपयांचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.