युवकाच्या अवयवदानाने पाच जणांना नवजीवन मृत्यूनंतरही अमर – एका निर्धाराने पाच जणांना मिळाले नवे आयुष्य.
एम.जे.न्यूज सातारा, (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

युवकाच्या अवयवदानाने पाच जणांना नवजीवन मृत्यूनंतरही अमर – एका निर्धाराने पाच जणांना मिळाले नवे आयुष्य.
एम.जे.न्यूज सातारा, (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड.26: ज्या हातांनी कुटुंबाच्या उन्नतीसाठी मेहनत घेतली, तेच हात मृत्यूनंतरही पाच जणांच्या जीवनात प्रकाश आणणारे ठरले. आर्थिक संकटांशी झुंज देणाऱ्या एका ऑटोरिक्षा चालकाच्या तरुण मुलाने मृत्यूनंतर अवयवदान करून पाच कुटुंबांना नवजीवन दिले.
किनवट तालुक्यातील मांडवा येथील ओमकार अशोक आकुलवार – वय 19 वर्ष हा युवक फर्निचरच्या कामातून कुटुंबाला मदत करत होता. त्याचे वडील अशोक आकुलवार ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ओमकारचे भविष्य उज्ज्वल असताना एका दुर्दैवी अपघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
*अपघात आणि संघर्ष*
दि.22 फेब्रुवारी 2025 रोज शनिवारी रात्री ओमकार आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त इतर दोन मित्रांसोबत गेला होता. रात्री नऊच्या सुमारास दुचाकीने घरी परतत असताना, बी.पी. कॉलेज समोरील विसावा ढाब्याजवळ अचानक रस्त्यावर आलेल्या एका प्राण्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्ध पडला. तातडीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला आदिलाबाद येथे ‘रेफर’ करण्यात आले. आदिलाबाद येथेही प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला नागपूरच्या मेडिकल ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू असताना टोन दिवस फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. विविध वैद्यकीय चाचण्यांनंतर डॉक्टरांनी ओमकार चा ‘मेंदू मृत’ (ब्रेन डेड) झाल्याचे घोषित केले.
*कर्तव्यभावनेने घेतलेला मोठा निर्णय*
अचानक आलेल्या या धक्क्याने कुटुंब हादरले. मात्र, ओमकारच्या वडिलांनी दुःखावर मात करून एक मोठा आणि सकारात्मक निर्णय घेतला. अवयव दानाचा त्यांच्या संमतीमुळे दि 24 फेब्रुवारी रोज सोमवारी दुपारी 2:00 वाजता ओमकारला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आणि त्याचे अवयव दान करण्यात आले. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या सूचनेनुसार, ओमकारची दोन मूत्रपिंडे आणि एक यकृत तातडीने तीन गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. त्याचे डोळे लवकरच गरजूंमध्ये प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत.
त्यामुळे एकूण पाच जणांना नवजीवन मिळाले आहे.दि. 25 रोज सोमवारी सकाळी 8:00 वाजण्याच्या सुमारास मांडवा येथे त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणा अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील व एक लहान बहीण असा परिवार आहे.
*मानवतेचा संदेश जिवंत ठेवणारा निर्णय*
गरिबीशी झुंज देणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या मुलाने मृत्यूनंतरही समाजासाठी अमूल्य देणगी दिली. वडिलांनी केवळ आपल्या मुलाला अमर केले नाही, तर एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला” मृत्यू नंतरही आपण कोणाला तरी जीवन देऊ शकतो !” ओमकारच्या कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयामुळे पाच घरांमध्ये आनंदाची प्रकाशकिरणे पसरली. हा केवळ अवयवदानाचा निर्णय नव्हता, तर माणुसकीच्या नात्याने दिलेला उज्ज्वल संदेश होता.