जावलीत बिबट्यांचा वाढता वावर उठतोय पशुधनाच्या जीवावर…
वनविभागाच्या असमाधानकारक उत्तरांवर पशुपालकांत नाराजी...

जावलीत बिबट्यांचा वाढता वावर उठतोय पशुधनाच्या जीवावर…
वनविभागाच्या असमाधानकारक उत्तरांवर पशुपालकांत नाराजी…
मेढा,ता.20: जावली तालुक्यात सध्या बिबट्याचा तसेच इतर जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून हे हिंस्र प्राण्यांचे शेतकऱ्यांच्या पशुधनावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी या घटना सध्या वाढत चालल्या असून यामुळे शेतकरी वर्ग पुरता हतबल झालेला पाहायला मिळत आहे. वनविभागाकडून सुद्धा शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने शेतकरी वर्ग वनविभागाच्या कारभारावर सुद्धा नाराज आहे..
जावली तालुका हा दुर्गम परिसरात व्यापलेला असून तालुक्याला निसर्गाचे खूप मोठे वरदान लाभले आहे. मात्र सध्या याच निसर्गसंपन्न जावली तालुक्यात वन्यप्राण्यांचा, पक्षांचा वावर दिवसेंदिवस वाढायला लागला असून यांच्या उपद्रवाने शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे. सध्या जावली तालुक्यातील बहुतांश ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून या बिबट्यांचे पशुधनावर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. गुरुवार (ता.१६) रोजीच्या रात्री बिबट्याने चोरांबे येथील तुळजा गोशाळेत हल्ला करत तेथील एका गिर जातीच्या गायीचा फडशा पाडला. तसेच यापूर्वी सुद्धा कुसूंबी मुरा, म्हाते, आलेवाडी आदी गावांत बिबट्यांच्या हल्ल्यात गायी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच शेळ्या, कुत्री लहान वासरे यांच्यावर सुद्धा बिबट्याचे होणारे हल्ले दिवसेदिवस वाढू लागल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. जनावरांना चरण्यासाठी डोंगरात किंवा शेतात सोडल्यावर बिबट्यांचे हल्ले होत आहेत. त्यामुळे शेतात जाताना सुद्धा शेतकरी भयभीत होऊ लागले आहेत.
तालुक्यातील अनेक गावांत वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांनी शेती करणे अक्षरशः बंद केले आहे. त्यातच अशा घटना वाढल्याने शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते मात्र वनविभागाकडून शेतकऱ्यांना त्याचा योग्य ती नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच आपल्या तक्रारी मांडायला गेल्यावर सुद्धा वनविभागाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत त्यामुळे शेतकरीवर्ग वनविभागावर प्रचंड नाराज आहे..
प्रतिक्रिया…
गुरुवारी रात्री आमच्या गिर जातीच्या गाईवर बिबट्याने हल्ला करून गाईला ठार केले. त्यावेळी याची माहिती वनविभागाला दिली असता घटनास्थळीच मृत गाई बांधून ठेवा टाकू नका, तशीच तिथे राहुद्या आम्ही सकाळी येऊन पंचनामा करतो असे उत्तर वनविभागाकडून मला मिळाले. हे उत्तर अत्यंत असमाधानकारक आहे. एका गायीची नुकसान भरपाई देऊन पुन्हा इतर गायींवर हल्ला होण्याची भीती आहेच. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा..
श्री.तुषार सपकाळ
तुळजा गोशाळा चोरांबे