बरबडा येथील स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका डॉ. सौ. मथुताई सावंत यांची निवड.
एम.जे.न्युज सातारा/राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड

बरबडा येथील स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका डॉ. सौ. मथुताई सावंत यांची निवड.
एम.जे.न्युज सातारा/राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड: दि 5/1/2025.स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार, दि. १९ जानेवारी रोजी बरबडा येथे सातवे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखिका डाॅ. सौ. मथुताई सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्या नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये मराठीच्या प्रोफेसर आहेत.
मराठवाड्यातील पहिल्या ग्रामीण कादंबरीकार अशी डॉ. सौ. सावंत यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. त्यांची वीस पुस्तके प्रकाशित झाली असून ‘राहू केतू’ आणि ‘जिनगानी’ ह्या दोन कादंब-या,
‘पाण्यातील पायवाट’ , ‘तिची वाटच वेगळी’ , ‘निवडुंगाची फुले’ आणि ‘पाणबळी’ हे ४ कथासंग्रह , ‘लगीनघाई? मुळीच नाही!’ आणि ‘नवरसांची नवलाई’ ही दोन नाटके, ‘सर्जनाचा शोध’, ‘समाज, साहित्य आणि संस्कृती’, ‘साहित्यसौरभ’, ‘अधोरेखित’ आणि ‘अक्षरवाटा’ हे ५ समीक्षालेखसंग्रह त्यांच्या नावावर जमा आहेत.
याशिवाय त्यांनी बालकुमार वाचकांसाठी सावित्रीबाई फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित संस्कारक्षम चरित्रे लिहिली आहेत.
‘राहू केतू’, ‘तिची वाटच वेगळी’ आणि ‘निवडुंगाची फुलं’ या साहित्यकृतींना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. समग्र साहित्यसेवेसाठी नांदेड जि. प.चा नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि सामाजिक कार्यासाठी सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे. तसेच विविध साहित्यसंस्थांचे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविले आहे. स्त्रीजीवनाचे अंतरंग आणि तिचे उपेक्षित भावविश्व यांचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी कसदार लेखन केले आहे. हे लेखन स्त्रीशक्तीसाठी प्रेरणादायी व मोलाचे ठरले आहे.
स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी यांनी नांदेड येथे मराठवाड्यात पहिले महिला महाविद्यालय स्थापन करून स्त्रीशिक्षणात मोलाचे योगदान दिले आहे. कुटुंब, समाज, संस्कृती व देशाच्या उभारणीत स्त्रीशक्ती मोलाची भूमिका बजावत असते, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी विपुल कार्य केले. ती चळवळ पुढे चालू राहावी, स्त्रीशक्ती सबल आणि सक्षम व्हावी, या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी साहित्य संमेलनाचे नियोजन केले आहे. त्यासाठी मराठीतील ख्यातनाम लेखिका डॉ. सौ. मथुताई सावंत यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
डॉ. जगदीश कदम, ग. पि. मनूरकर, प्रा. नागनाथ पाटील, प्रा. नारायण शिंदे, प्रा. इंद्रजीत भालेराव आणि कथाकार राजेंद्र गहाळ इ. मान्यवरांनी यापूर्वी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
या साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला सकाळी ग्रंथदिंडी निघेल. त्यात पारंपरिक वेशभूषा, भजने, लेझीम व ग्रामीण देखाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
उद्घाटनाच्या सत्रात संमेलन अध्यक्षा डॉ. सौ. मथुताई सावंत यांचे अध्यक्षीय भाषण होईल. दुसऱ्या सत्रात प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम असेल. तिसरे सत्र निमंत्रित कवयित्रींचे कविसंमेलन, तसेच लोकसाहित्यातील भारूड, गवळण व जात्यावरच्या ओव्या असा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम असेल, असे संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी , उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी, व्ही. टी. सुरेवाड , शिवाजीराव धर्माधिकारी, सौ. छायाताई दिलीपराव धर्माधिकारी, जगदीशराव धर्माधिकारी, तसेच ज. ने. वि. बरबडाचे प्राचार्य तथा सहसचिव सुदर्शनराव धर्माधिकारी आणि संयोजन समितीतर्फे कळविण्यात आले आहे.