मासेमारी करत आसताना आपटी गावच्या युवकाचा शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू.
एम.जे.न्युज.सातारा.

मासेमारी करत आसताना आपटी गावच्या युवकाचा शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू.
एम.जे.न्युज.सातारा.
आपटी.दि.4 :सुत्रांच्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात एक जण बुडून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. तापोळा भागातील आपटी गावाचे रहिवाशी किसन धोंडीबा कदम (वय ४३) हे बोटीतून मासेमारी करण्यासाठी जाळे टाकत असताना पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. कदम यांचा ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून शोध घेतला, मात्र सायंकाळ सहा वाजेपर्यंत ते सापडले नाहीत. शिवसागर जलाशयातील खोल आणि थंड पाणी असल्याने शोधकार्यात अडथळा येत होता.
याबाबत घटनास्थळा वरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तापोळा खोऱ्यातील आपटी येथील किसन धोंडीबा कदम हे शिवसागर जलाशयात शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान बोटीतून मच्छीमारी साठी जाळे टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाळी टाकत असताना त्यांचा तोल गेल्याने ते पाण्यात बुडाले. याबाबत आपटी गावचे पोलीस पाटील शामराव गायकवाड यांनी या घटनेची माहिती मेढा पोलिसांना कळवली. त्यानंतर आज सकाळपासून स्थानिक नागरिकांनी बोटीच्या साहाय्याने गळ टाकून शोधकार्य सुरू केले होते. यावेळी कदम यांचा शोध घेण्यासाठी तापोळा खोऱ्यातील गावाचे ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते.
सकाळी अकराच्या सुमारास महाबळेश्वर, सह्याद्री आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या टीमने बोटीच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही जवानांनी पाण्यात पोहत जाऊन शोध घेतला, मात्र बेपत्ता कदम सापडले नाहीत. त्यातच कोयनेच्या शिवसागर जलाशयाची पाणी पातळी खोल असल्याने तसेच थंडी असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. सायंकाळी उशिरा हे शोधकार्य रेस्क्यू टीमने थांबवले. रविवारी सकाळी पुन्हा हे शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. या घटनेमुळे तापोळा परिसरामध्ये शोकाकुल वातावरण आहे.
दरम्यान, घटनास्थळी मेढा पोलीस ठाण्याचे बामणोली बीट सहाय्यक पोलीस फौजदार अनिल भिसे आणि सहकारी धीरज बेसके दाखल झाले असून ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनीही शोधमोहीम सुरू केली होती. सोळशी, कांदाटी आणि तापोळा खोरे कोयनेच्या शिवसागर जलाशयाने व्यापले आहे. या ठिकाणी मुख्यत्वे भातशेती आणि पर्यटनावर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह चालू असतो. त्यातच जोड व्यवसाय म्हणून मच्छीमारी सुद्धा सुरू आहे. या ठिकाणी जलाशयात येथील लोक मच्छीमारी करतात.
गुरुवारी रात्री कदम हे मच्छीमारी करण्यासाठी बोटीतून जाळे टाकत असताना तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. ही घटना रात्री आठच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती परिसरात उशिरा समजली. रात्रीची वेळ असल्याने या परिसरातील नागरिकांनी आज सकाळीच शोध कार्यास सुरुवात केली होती.