मुंबई-पुण्याहून आलेल्या तरुणांचा उपक्रम: दिवदेववाडीत वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा घेतला संकल्प..
www. mjnewssatara.live

मुंबई-पुण्याहून आलेल्या तरुणांचा उपक्रम: दिवदेववाडीत वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा घेतला संकल्प..
दिवदेववाडी, दि. २२ जून –
पर्यावरण दिनानिमित्त मुंबई व पुणे येथून खास आलेल्या तरुणांनी आपल्या मूळगावी – दिवदेववाडीत एकत्र येत भव्य वृक्षारोपण मोहिम राबवली. या उपक्रमामुळे गावात उत्साहाचे आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
सकाळपासूनच विविध ठिकाणी फळझाडे, सावली देणारी झाडे आणि पर्यावरणपूरक प्रजातींचे रोपण करण्यात आले.
विशेष बाब म्हणजे एकूण १५० झाडे लावण्यात आली असून, त्यासाठी तरुणांनी जबाबदारीने पुढाकार घेतला.
या उपक्रमाचा हेतू केवळ झाडे लावणे नव्हता, तर पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता.
“हिरवे गाव, सुंदर गाव”, “निसर्ग वाचवा – भविष्य घडवा” असे नारे देत तरुणांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश गावभर पोहोचवला.
या प्रसंगी युवकांनी सांगितले –
“आज लावलेली झाडं उद्या आमच्या गावाचा प्राणवायू ठरतील. निसर्ग आपला गुरु आहे, आणि त्याचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे.”
या मोहिमेत ग्रामस्थांचाही मोठा सहभाग लाभला. काहींनी स्वतः झाडे लावली, तर काहींनी पाणी, साधनसामग्री व आवश्यक मदत करून मोलाचा हातभार लावला.
गावकऱ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.