
कास पठारावर तंगूसाची जाळी बसवण्यास प्रारंभ….
हंगाम पंधरा ऑगस्ट नंतरच…
कास, दि.1जुन. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर फुलांच्या परिसराचे संरक्षण करण्यासाठी तंगूसाची जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली असून आगामी हंगामाच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण आहे.
जाळी बसवण्यात येत असली तरी कास पठारावर फुले बहरण्यास अवकाश असून आगामी हंगाम हा पंधरा ऑगस्ट नंतरच सुरू होत असतो. त्यामुळे आता फुले बघण्याच्या आशेने येणारांची निराशा होवू शकते.
कास पठार विविध रंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. या महिन्याच्या शेवटाला झालेल्या पावसामुळे कास पठार हिरवेगार झाले असून काही प्रदेशनिष्ठ फुलांचे तुरळक दर्शन होवू लागले आहे. जून, जुलै महिन्यात सातारेन्सिस या खास सातारची ओळख सांगणाऱ्या फुलाचे दर्शन पठारावर होते. त्यानंतर रानहळद (चवर) पठारावर मोठ्या प्रमाणात येते. पठारावर फुलांच्या गालिच्छांची उधळण होते ती सप्टेंबर मधेच. यावेळी गेंद, तेरडा, सोनकी, मिकी माऊस या फुलांनी पठार बहरून जाते.
कास पठार हे जैवविविधतेचे माहेरघर आहे. कातळ खडकाळ असलेला पठाराच्या पृष्ठभागावर मातीचे थर कमी आहेत.
मान्सूनच्या आगमनानंतर येथील जीवसृष्टी बहरायला लागते. दाट धुके, मुसळधार पाऊस अशा वातावरणामुळेच येथे विविधरंगी फुले बहरतात. मुसळधार पावसानंतर श्रावणाच्या ऊन पावसाच्या खेळात येथील जीवसृष्टी खऱ्या अर्थाने बहरते. फुलांचे गालिचे यावेळीच बहरतात. त्यामुळे आता पठारावर फुले बघण्यासाठी येणारांनी याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे.
कास पठाराचे व्यवस्थापन कास पठार कार्यकारी समिती वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली करते. कास, एकीव, पाटेघर, आटाळी, कुसुंबी, कासाणी या सहा गावांचा सहभाग असलेली समिती पठारावरील फुले व आजूबाजूच्या निसर्गाचे संवर्धन करण्याचे काम करते. या दृष्टीनेच सद्यस्थितीत कास पठाराला तंगूसाची जाळी बसवण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होईल.
लोखंडी जाळी काढल्याने तंगूसाची जाळी…
कास पठाराला सुरूवातीला लोखंडी जाळीचे कुंपण होते. या लोखंडी जाळीमुळे प्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होतात. तसेच पठारावरील फुलांचे प्रमाण कमी होत आहे असे तज्ञांचे मत पडल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या पुढाकाराने ही जाळी काढून टाकण्यात आली. यानंतर पर्यटकांच्या गर्दीपासून फुलांचे संरक्षण करण्यासाठी हंगाम कालावधी पुरती तंगूसाची जाळी बसवण्यास सुरूवात केली. हंगामानंतर ही जाळी काढून टाकण्यात येते. त्यामुळे येथील नैसर्गिक परिसंस्था अबाधित राखण्याचे काम केले जाते.
प्रतिक्रिया – अवकाळी पाऊस व मान्सूनच्या आगमनाने पठारावर धुके, खळाळून वाहणारे झरे, हिरवेगार पठार पाहावयास गेल्या काही दिवसांत लोकांची गर्दी होत असून समिती मार्फत पठाराचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या बाबी केल्या जात आहेत. आगामी हंगामाला अजून अवकाश असून समिती पर्यटकांना सोयीसुविधा देण्यासाठी आवश्यक ती तयारी करत आहे.
विजय वेंदे
सदस्य. कास कार्यकारी समिती
फोटो –
कास – कास पठारावर तंगूसाची जाळी बसवताना समितीचे कर्मचारी.