Uncategorized

अतिवृष्टी दरम्यान प्रशासनाने तात्काळ करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी

www.mjnewssatara.live

अतिवृष्टी दरम्यान प्रशासनाने तात्काळ करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी

www.mjnewssatara.live

सातारा.दि.१९.भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या (ऑरेन्ज व रेड अलर्ट) अंदाजानुसार सातारा जिल्हयात सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान, अतिवृष्टी होत आहे. सदर तालुक्यामध्ये घाटरस्त्यामध्ये दरडी कोसळणे,भूस्खलन होणे अशा घटना घडत असतात. पश्चिमेकडील तालुक्यातील बहुतांश गावे ही डोंगर, कड्या-कपाऱ्यांमध्ये वसलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाणे-येणे अथवा संपर्क करण्यास अडचण निर्माण होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.

सातारा जिल्हयातील पश्चिमेकडील तालुक्यामध्ये (पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई आणि सातारा) या तालुक्यामधील अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे/भूस्खलनामूळे धोका निर्माण होणाऱ्या शहरी / गावातील नागरिकांनी अतिवृष्टीच्या कालावधीत सतर्क रहावे, धोकादायक स्थतीत अथवा मोडकळीस आलेल्या घरात नागरिक वास्तव्य करणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच अशा नागरिकांना स्वताःहून स्थलांतरित होणेकामी कार्यवाही करावी. अथवा नियमानुसार नोटीस देवून सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित करावे.

धोकादायक स्थितीत वास्तव्य करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची सोय उपलब्ध करावी. सदर कुटुंबांना नजिकच्या सुरक्षित ठिकाणी (शहरातील गावातील मंदिरे, समाजमंदिरे, शाळा,महाविदयालये,) या ठिकाणी सुरक्षित निवाऱ्याच्या सोय संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी करावी. अथवा जवळचे नातेवाईक यांचेकडे निवाऱ्यासाठी पाठविण्यात यावे. धोकादायक ठिकाणी शक्यतो प्रवास टाळावा. कडा कोसळणे/दरडी कोसळण्याच्या ठिकाणी थांबू नये. याबाबत नागरिकांना सूचित करावे.

अतिवृष्टीचे काळात मोठया प्रमाणात डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरु असतो. ओढे-नाले पात्र भरुन वाहत असतात अशावेळी ओढयानाल्यातून प्रवास टाळावा. तसेच ओढ्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास धोकादायक स्थितीमध्ये पूल ओलांडू नये याबाबत विविध पध्दतीने प्रचार-प्रसिध्दी करावी.

पर्यटनाचे ठिकाणी उदा. धबधबे, तलाव इ. ठिकाणी धोकादायक ठिकाणी प्रवेश करुन देऊ नये. त्याच प्रमाणे धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचे अथवा सेल्फी घेण्याच्या ठिकाणी सुरक्षित उपाययोजना राबवावी. अशा ठिकाणी धोक्याची सूचना देणारे व प्रवेश निषिध्द असणारे फलक लावावेत.

नदी अथवा नाल्याची पाणी पातळी वाढल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात प्रवेश करु नये यासाठी संबंधितांना आप-आपल्या कार्यकक्षेतील सर्व नागरिकांना व ग्रामस्तरावरील यंत्रणेस वेळोवेळी सूचित करावे. तसेच पूलावरुन पाणी वाहत असताना पूल वाहतूकीसाठी तात्काळ बंद करावा, अशा मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button