पहिल्या पावसातच सांगवी रस्ता गेला वाहून
मंत्र्यांच्या जिल्ह्यात ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम

पहिल्या पावसातच सांगवी रस्ता गेला वाहून
मंत्र्यांच्या जिल्ह्यात ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम
कुडाळ:दि.29.जावली तालुक्यातील सांगवी तर्फे कुडाळ गावचा रस्ता गेल्या वर्षी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष प्रयत्न करून मंजूर करून घेतला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मजूर झाला असून यासाठी तब्बल १ कोटी ९१ लाख ४३ हजार रुपये एवढा निधी मंजूर होऊन सध्या कामही सुरू आहे.गेल्या चार महिन्यापासून सांगवी रस्त्याचे काम सुरू आहे परंतु गेल्या सहा ते सात दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्याची संरक्षण भिंत खचली गेली आहे. त्यामुळे हा रस्ता मोठ्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.पहिल्या पावसातच काम पूर्ण होण्याअगोदरच या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाल्यास नेमका कामाचा दर्जा कसला हा मोठा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठेकेदाराकडून पावसाचे व इतर पाणी जावे याकरता चर काढण्यात आली होती.मात्र पहिल्या पावसातच ही चर पूर्णपणे मुजून गेली आहे.त्यामुळे संपूर्ण पावसाचे पाणी रस्त्यावर आले. ज्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधली आहे त्या ठिकाणी पावसाचे पाणी जाऊन साठत होते त्यामुळे ही भिंत जागेवरून सरकली आहे.मुळातच रस्ता होत असलेली जमीन कोणत्या प्रकारची आहे हे माहीत असतानाही रस्त्याची सरंक्षण भिंत बांधताना कशा पद्धतीचे बांधकाम करण्यात आले याचे सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.या भितीचे काम निकृष्ट झाल्यानेच ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केला आहे.
सांगवी फाटा ते सांगवी गाव या रस्त्यासाठी तब्बल १ कोटी ९१ लाख ४३ हजार रुपयांचा निधी रस्त्यावर खर्च होणार आहे.यात जर असे दर्जाहीन काम झाल्यास हा रस्ता किती दिवस टिकणार असा सवाल उपस्थित होत आहे.सत्तर वर्षांनंतर या गावाला नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून हा रस्ता होत आहे.या कामात ठेकेदारांकडून होत असलेली हयगय सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणारी आहे.प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अशी ग्रामस्थांची तीव्र मागणी आहे.
चौकट:
ठेकेदारावर कारवाई होणार का?
गेल्या चार महिन्यापासून हा रस्ता बनवण्यास सुरुवात झाली आहे.कोणत्याही प्रकारचे उच्च प्रतीचे साहित्य न वापरता हे काम ठेकेदार करत होता. वारंवार ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिले असताना देखील ठेकेदाराने काम करत असताना चालढकल केली आहे. त्यामुळे शासनाचा निधी ठेकेदाराच्या उर्मटपणामुळे वाया जातो आहे.
ग्रामस्थ सांगवी
कोट:
मंत्र्यांच्याच मतदारसंघात निकृष्ट दर्जाची कामे
सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग शंभर दिवसाच्या विकासाच्या कृती आराखड्यामध्ये राज्यात द्वितीय नंबरला अव्वल राहिले आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या मतदारसंघात अशी निकृष्ट कामे जर होत असतील तर ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम मंत्री कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.