अंगणवाडी सेविका वयाच्या 56 व्या वर्षी झाली बारावी पास
घर,संसार मुलं सांभाळत दिली बारावीची परीक्षा,जिद्धीला सलाम

अंगणवाडी सेविका वयाच्या 56 व्या वर्षी झाली बारावी पास
घर,संसार मुलं सांभाळत दिली बारावीची परीक्षा,जिद्धीला सलाम
5 करहर:०५/०५/२०२५
फेसबुक,इंस्टाग्राम,ट्विटर,व्हाट्सअप अशा विविध सोशल मीडियाचा वापर न करता,खंडित झालेल्या शिक्षणाची आवड निर्माण करून,शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसण्याचे पुन्हा एकदा सिद्ध करत वयाच्या 56 व्या वर्षी कुडाळ गावातील अंगणवाडी सेविका सौ.सुवर्णा विनायक पवार यांनी बारावीच्या परीक्षांमध्ये 50.83% मिळवून यश संपादन केले आहे.
वयाच्या १९ व्या वर्षी लग्न झाले. शिकण्याची इच्छा असतानाही लग्नासाठी ते अर्धवट सोडून संसार सुरु झाला.अनेक अडचणी आल्या.संघर्ष केला मात्र जिद्द काय असते हे शाळा सोडून तब्बल ३८ वर्षे झाले असतानाही देखील बारावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या कुडाळ ता.जावळी येथील अंगणवाडी सेविका सौ.सुवर्णा विनायक पवार या बारावी परीक्षा 50.83% मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत.त्यामुळे यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
कमी वयात लग्न झालेल्या सौ.सुवर्णा पवार यांचा हा जीवनाचा प्रवास खडतर असाच म्हणावा लागेल.क्षेत्र माहुली ता.सातारा हे त्यांचे माहेर असलेल्या सुवर्णा यांनी क्षेत्र माहूली येथील श्रीराम हायस्कूल विद्यालयामधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते.मात्र लग्न झाल्याने,शिक्षण अर्धवट राहिले.मग सुरू झाला होता संसार,घरची परिस्थिती हलाकीची असतानाही न डगमगता जिद्दीने संसाराचा प्रवास ठेवला.अश्या वेळी साथ मिळाली ते पती विनायक मारुती पवार व दीर सुरेश पवार यांची,सुवर्णा यांनी संसार करत असताना आलेल्या परिस्थितीशी दोन हाथ करत सामना केला. पुढे जाऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास प्रकल्प जावली विभागा अंतर्गत कुडाळ येथील अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर २००१ मध्ये नोकरी मिळाली.तद्यनंतर २०१० साली त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून बढती मिळाली.
सौ.सुवर्णा पवार यांना दोन मुले,दोन सुना,एक मुलगी व जावई असून या सर्वांची मोलाची साथ बारावी परीक्षा देण्यासाठी लाभली आहे.तसेच सुवर्णा पवार यांची एक सून डिप्लोमा सिव्हिलच्या शेवटच्या वर्षाला असून दुसरी सून कुडाळ येथील अंगणवाडी मध्ये मदतनीस या पदावर कार्यरत आहे.मुलगा-मुलगी भेदभाव न करता त्यांनी दोन्ही सुनांना उच्च शिक्षण दिले आहे.बारावीची परीक्षा देता यावी म्हणून न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज,हुमगाव या कॉलेजला सुवर्णा पवार यांनी प्रवेश मिळवला.जिद्दीने इतक्या वर्षानी परीक्षा देऊन देखील आज बारावी परीक्षा उत्तीर्ण होऊन मिळविलेल्या यशामुळे त्यांचे मोठे कौतुक होत आहे.त्यांच्या यशाच्या वाटचालीत त्यांचे पती,मुले,सून व त्यांच्याच क्षेत्रात असणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ.कदम मॅडम व अंगणवाडीच्या सेविका,मदतनीस यांची मोलाची साथ लाभली आहे.
चौकट:-
आमच्या आईने केलेला संघर्ष आम्ही आमच्या डोळ्यांनी पहिला आहे.एवढ्या कठीण प्रसंगात देखील तीने आमच्यावर योग्य ते संस्कार केले आहेत.त्यामुळे खडतर प्रवासात खंबीर कसे रहायचे हे तिच्याकडे पाहून आम्ही शिकलो आहे.तीने पुढील शिक्षण देखील पुर्ण करावे अशी आमची इच्छा आहे.
मुलगी: सौ.प्रियांका सतीश साळुंखे (DIP-मेकॅनिकल)
कोट:
आशा काही प्रसंगात घरातील महिला पाठीशी नसतात परंतु माझ्या दोन्ही सुनांनी मला परीक्षेच्या कालावधीमध्ये मोलाची साथ दिली आहे.तसेच माझ्या सुनांनी राहिलेले पुढील उच्च शिक्षण पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे.तसेच माझ्या क्षेत्रातील सर्व सहकारी मैत्रिणींनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.