७ वे एकता मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्राचार्या डाॅ.दिपाताई क्षीरसागर यांची निवड [दि.१७ व १८ रोजी दहिवंडीत साहित्य संमेलन].
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे.

७ वे एकता मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्राचार्या डाॅ.दिपाताई क्षीरसागर यांची निवड
[दि.१७ व १८ रोजी दहिवंडीत साहित्य संमेलन].
शिरूर. दि.4.एकता फाउंडेशन शिरुर
कासार (महाराष्ट्र राज्य) द्वारा आयोजित ७ वे एकता मराठी साहित्य संमेलन तालुक्यातील दहिवंडी येथील महात्मा फुले विद्यालयात दि.१७ व १८ जानेवारी रोजी संपन्न होणार असून या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर च्या सहकार्यवाह तथा बीड येथील के.एस.के.महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.दिपाताई क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाल्याचे एकता कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. एकताचे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य साहित्यिक अनंत कराड यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव पत्रकार गोकुळ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मराठवाड्यासह राज्यभरातील नवकवी-लेखकांना प्रेरणा मिळावी म्हणून सन २०१८ पासून ग्रामीण भागात एकताच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. आजपर्यंत शिरूर कासार, वारणी, मानूर, पिंपळनेर, शांतीवन (आर्वी), गोमळवाडा या ठिकाणी एकताची मराठी साहित्य संमेलने दिमाखदारपणे पार पडली आहेत. जेष्ठ कवी सय्यद आलाऊद्दीन, सोपान हळमकर, प्रभाकर साळेगावकर, डाॅ.दासू वैद्य, दिनकर जोशी आणि प्रा.डाॅ.भास्कर बडे यांनी एकताच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले असून माध्य.व उच्च माध्य.शिक्षण मंडळ लातूर चे तत्कालीन सचिव मा.शशिकांत हिंगोणेकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.अमर हबीब, सुप्रसिद्ध नाट्यकर्मी मा.राजकुमार तांगडे, चपराकचे संपादक मा.घनशाम पाटील, मराठवाडा पदवीधर शिक्षक आमदार मा.विक्रम काळे आणि सुप्रसिद्ध बालसाहित्यिक मा.बाबा भांड यांनी एकताच्या साहित्य संमेलनांचे उद्घाटकपद भूषविलेले आहे.
संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सुरवात ग्रंथदिंडी ने होणार असून तद्नंतर उद्घाटन समारंभ, राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व्यंगचित्र प्रदर्शन उद्घाटन, महाराष्ट्राची लोकधारा, लेखक आपल्या भेटीला, परिसंवाद-१, कविसंमेलन भाग-१ आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम तर दुसर्या दिवशी कथाकथन, परिसंवाद-२, कविसंमेलन भाग-२, सन्मान भुमीपुत्रांचा, ठराव वाचन, समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाची सांगता होणार आहे. तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसह, साहित्य प्रेमी नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकताच्या सल्लागार तथा संमेलनाच्या स्वागताध्यक्षा एड.भाग्यश्री ढाकणे-चेमटे तसेच, दहिवंडीचे सरपंच कालिदास आघाव यांनी केले आहे.
एकताचे सचिव पत्रकार गोकुळ पवार, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, संस्थापक सदस्य व्यंगचित्रकार दिपक महाले, एड.भाग्यश्री ढाकणे, महिला आघाडीच्या लता बडे आणि साहित्यिक अनंत कराड यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.