वाचनातून व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मदत होते–डॉ. हनुमंत भोपाळे.
एम.जे.न्युज सातारा/राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड.

वाचनातून व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मदत होते–डॉ. हनुमंत भोपाळे.
एम.जे.न्युज सातारा/राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड.
नांदेड दि. 14 -व्यक्तीचा भावनिक, वैचारिक, सामाजिक आणि बौध्दिक विकास हा वाचनातून होतो. ज्या क्षेत्रात विकास करायचा आहे, त्या क्षेत्रातील ग्रंथसंपदेचे वाचन, मनन आणि चिंतन केल्यास त्या त्या क्षेत्रात यश प्राप्त होते. म्हणून सतत वाचन करावे. वाचनातून माणूस समृध्द होतो, असे प्रतिपादन सुप्रसिध्द लेखक डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले. ते अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या ’वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत ’लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमात निमंत्रित लेखक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. जे.सी. पठाण होते. याप्रसंगी विचारपीठावर डॉ. रघुनाथ शेटे, डॉ. साईनाथ शेटोड, डॉ. संगीता घुगे, डॉ. एस.पी. औरादकर, डॉ. काजी मुक्तारोदिन यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ. हनुमंत भोपाळे यांनी महाविद्यालयास ग्रंथ भेट दिली. डॉ. भोपाळे पुढे बोलताना म्हणाले की, शब्दांची कलात्मक गुंफन करून लेखक होता येते. लेखनाला संघटनशक्तीची जोड असणे आवश्यक आहे. माणूस जोडणे म्हणजे देश जोडणे होय. शासन वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे, ही बाब स्तुत्य आहे. वाचन संस्कृतीबरोबर कालानुरूप लेखन झाले पाहिजे, यासाठी लेखन संस्कृती जोपासण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य जे.सी. पठाण म्हणाले प्रोफेसर हनुमंत भोपाळे यांनी शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या पायाभरणीपासून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवले. वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी ग्रंथभेट देतात आणि लेखनही करतात. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येयप्राप्तीसाठी सतत वाचन, लिखाण करावं, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. ल.ना. वाघमारे यांनी केले, तर आभार डॉ.संगीता घुगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. उमाकांत शेळके, बालाजी कवठेकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी प्राध्यापकवृंद आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.