क्षेत्र,कुसुंबी काळेश्वरीचा वज्रलेप वर्धापन दिन मोठया भक्तिमय वातावरणात साजरा.
तिर्थक्षेत्र कुसुंबीला 'ब' वर्ग दर्जा मिळवून देणार,मंत्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले.

क्षेत्र,कुसुंबी काळेश्वरीचा वज्रलेप वर्धापन दिन मोठया भक्तिमय वातावरणात साजरा.
तिर्थक्षेत्र कुसुंबीला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देणार,मंत्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले.
क्षेत्र कुसुंबी,दि.१३: तीर्थक्षेत्र कुसुंबी काळेश्वरी देवीचा वजर्लेप वर्धापन दिन सोहळा शुक्रवार (ता.१०) व शनिवार (ता.११) रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी देवीची विधिवत पूजाअर्चा करत देवीचा अभिषेक, होमहवन, महाआरती, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम पार पडले. या सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले सुद्धा उपस्थित राहिले. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काळेश्वरी मातेच्या मंदिराला लवकरच ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देणार असल्याचे सांगितले.
कुसुंबी ता. जावली येथील राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या काळेश्वरी देवी मूर्तीचा वज्रलेप सोहळा मागील वर्षी पार पडला होता. या सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिन सोहळा कुसुंबी नगरीत शुक्रवार (ता.१०) व शनिवार (ता.११) रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. वेदमूर्ती महेश गोविंद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात शुक्रवार (ता.१०) रोजी मंत्रपठण, महाआरती, देवीचा जागर हे कार्यक्रम पार पडले. तर शनिवार (ता.११) रोजी देवीला पंचामृत अभिषेक, यज्ञमंडप, स्थानिक पूजन, सर्व तीर्थ स्नान, शतचंडी महायज्ञ, महाआरती हे कार्यक्रम पार पडले. या सोहळ्यादरम्यान उपस्थितांची महाप्रसादाचे आयोजन सुद्धा काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमादरम्यान देवीच्या मूर्तीची केलेली सजावट सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरत होती. या कार्यक्रमासाठी कुसुंबीतील मुंबईकर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. याशिवाय गावातील ग्रामस्थ तालुक्यातील लोकांनी सुद्धा या सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट तसेच कुसुंबी ग्रामस्थांनी कष्ट घेतले.
चौकट:..
सोहळ्यास मंत्री. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची उपस्थिती…
काळेश्वरी देवीच्या वज्रलेप वर्धापन दिन सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी काळेश्वरी मातेच्या मंदिरास लवकरात लवकर “ब” वर्ग दर्जा मिळवून देणार असल्याचे सांगितले. तसेच कुसुंबीतील इतरही विकासकामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.